विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मागील लेखात आपण एमपीएससीच्या बाबतीत सर्व प्राथमिक चर्चा केल्यानंतर आता नेमका अभ्यास कुठून आणि कसा करायचा? या महत्त्वाच्या, अर्थात कळीच्या प्रश्नाचा उलगडा करणार आहोत. यातूनच राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासाची पद्धती सिद्ध होणार आहे. यालाच आपण एमपीएससीचे अभ्यासधोरण संबोधणार आहोत.
प्रस्तुत अभ्यास धोरणातील प्रारंभिक बाब म्हणजे या परीक्षेचे, त्यात समाविष्ट प्रत्येक टप्प्याचे स्वरूप सखोलपणे लक्षात घ्यावे. स्वरूपानंतर लक्षात घ्यावयाची बाब म्हणजे अभ्यासक्रम होय. अभ्यासक्रमातील प्रकरणे, त्यातील उपघटक आणि त्यात अंतर्भूत घटकांचे बारकाईने वाचन करावे. अभ्यासाची लांबी व रूंदी लक्षात घेतल्यास त्याचे योग्य नियोजन करणे सुलभ ठरते. त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाची खोलीही ध्यानात घ्यावी. त्यातूनच एकंदर अभ्यासाचा आवाका निश्चित करता येणे शक्य बनते.
अभ्यास धोरणातील पुढील महत्वपूर्ण घटक म्हणजे आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण होय. पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेच्या मागील किमान 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे वाचन करून त्याचे विश्लेषण करावे. त्या-त्या टप्प्यात नेमके कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात? त्यात कोणत्या अभ्यास घटकाला किती महत्त्व दिले जाते? एखाद्या घटकावर संकल्पनात्मक, माहिती-प्रधान प्रश्न कशा स्वरूपाचे व किती असतात? संबंधित घटकात चालू घटनांवर काही प्रश्न आहेत का ? एखाद्या घटकावर विचारल्या जाणाऱया प्रश्नाच्या स्वरूपात काही मूलगामी बदल होत आहेत का? प्रश्नांची खोली वाढत आहे का? इ. महत्वपूर्ण अंगांनी प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करावे. यामुळे प्रश्नांचे स्वरूप व त्यात होणारे बदल लक्षात घेता येतात. तसेच अभ्यासक्रमातील कोणता भाग अधिक महत्त्वाचा आहे हेही लक्षात येते. प्रश्नपत्रिकेत येणारे काही नवे प्रवाह व कलही अधोरेखित करता येतात. त्याशिवाय आपण एखाद्या घटकासाठी जे संदर्भ वापरतो ते पुरेशे आहेत किंवा नाहीत याचीही तपासणी करता येते. आणि शेवटी आपल्या अभ्यासाची दिशाच निश्चित करणे शक्य होते.
उपरोक्त बाबी केल्यानंतर हाती घ्यावयाची बाब म्हणजे संदर्भ साहित्याचे संकलन. आयोगाने दिलेला अभ्यासक्रम आणि त्यावरील प्रश्नपत्रिका सूक्ष्मपणे पाहून कोणत्या विषयासाठी नेमके कोणकोण संदर्भसाहित्य वापरायचे हे ठरवावे. यासंदर्भात पायाभूत पाठय़पुस्तके, प्रमाणित पुस्तके आणि निवडक संदर्भ ग्रंथाचा वापर महत्त्वाचा ठरतो. त्याशिवाय प्रस्तुत संदर्भसाहित्य हे अधिकृत, प्रमाणित, दर्जेदार आणि अद्ययावत असेल याची खबरदारी घ्यावी. त्यातील निवडक व प्रमाणित संदर्भ साहित्याची निवड करावी. त्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेणे अधिक श्रेयस्कर ठरते. म्हणूनच सांगोपांग विचारविमर्शानंतरच संदर्भपुस्तकाची खरेदी करून अभ्यासाची सुरूवात करावी. यासंदर्भात लक्षात ठेवायची एक महत्वपूर्ण परीक्षेसाठी `अनेक पुस्तके मर्यादित अथवा कमी वेळा वाचण्यापेक्षा काहीच पुस्तके पुन्हा-पुन्हा वाचण्यावर' लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे संबंधित विषयाचा सखोल अभ्यास करणे सोईस्कर ठरते. त्याचा नेमका अर्थ, मतितार्थ, त्याचे आयाम इ. बाबींचे योग्यरीतीने आकलन करणे शक्य बनते आणि अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकावर प्रभुत्व निर्माण करता येते.
संदर्भसाहित्यातील एक मध्यवर्ती घटक म्हणजे वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांचा वापर होय. त्यादृष्टीने लोकसत्ता हे दैनिक; परिवर्तनाचा वाटसरू हे पाक्षिक; लोकराज्य व योजना ही मासिके आणि युनिक प्रकाशनाची `महाराष्ट्र वार्षिकी' या यादीवर भर द्यावा. पूर्व, मुख्य आणि मुलाखतीत विचारल्या जाणाऱया चालू घडामोडीतील प्रश्नांच्या तयारीसाठी वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांचे नियमित, सातत्यपूर्ण व सखोल वाचन अत्यावश्यक ठरते. संदर्भाचे वाचन करतांना सूक्ष्म स्वरूपातील नोट्सची तयारी, महत्त्वाची कात्रणे कापून ठेवणे आणि एकाच मुद्याच्या विविध आयामासह मांडलेल्या विविध मत-मतांतराच्या नोट्स तयार करणे, या बाबींवर भर द्यावा. त्याआधारे एका बाजुला निव्वळ तांत्रिक माहिती प्रधान आणि दुसऱया बाजुला विश्लेषणात्मक बाजुला योग्य न्याय द्यावा. अन्यथा आपला अभ्यास एकांगी होण्याचीच शक्यता आहे.
No comments:
Post a Comment